मुंबई : मुंबईतील पत्राचाळ प्रकरणामध्ये अटकेत असणारे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीच्या दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने राऊतांच्या जामीन अर्जावरील निर्णय आजपर्यंत (९ नोव्हेंबर) राखून ठेवला होता. यावर आज सुनावणी होणार असल्याने सर्व ठाकरे गटाचे लक्ष या सुनावणीकडे राहाणार आहे.
संजय राऊत हेच या संपूर्ण प्रकाराचे मास्टर माईंड असल्याचा ईडीने दावा केला होता, त्यानुसार संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. मात्र, आपल्यावरील सर्व आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणावर आजच्या सुनावणीमध्ये न्यायालय कुणाची बाजूने निर्णय देणार हे महत्वाचं ठरणार आहे.
संजय राऊत व प्रवीण राऊत या दोघांच्या जामीन अर्जावर एकाच दिवशी न्यायालय निकाल देणार असल्याचे हा निकाल ठाकरे गटासाठी महत्वाचा ठरणार आहे. मागील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती. यावेळी ईडीने संजय राऊत यांच्या जामीनासंदर्भात लेखी उत्तर न्यायालयात सादर करण्यात आले होते. या संजय राऊत यांच्या जामीन निकालाचा परिणाम आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.