सूर्यकांत भिसे
लोणंद : शासनाने स्वच्छ वारी, सुंदर वारी योजने अंतर्गत संतांच्या पालखी सोहळ्यात शौचालये उभी करुन आरोग्य उत्तम राखण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. परंतु या वारीतील शौचालये स्वच्छ नसल्याने त्याचा योग्य वापर होत नाही. ही शौचालये चोवीस तास सुरु रहावीत व ती स्वच्छ ठेवावीत. यामध्ये करोडोंचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाजाच्या बैठकीत करण्यात आला आहे.
या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, राणु महाराज वासकर, नाना वासकर, सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, विश्वस्थ भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, भाऊ गोसावी, भाउसाहेब फुरसुंगीकर, निलेश कबीर, भागवत चौरे, उध्दव चोपदार यांच्यासह दिंडी प्रमुख उपस्थित होते .
आज (रविवार) लोणंद मुक्कामी शितोळे सरकार यांच्या पालावर हैबतबाबांचे वंशज राजेंद्र आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयावर दिंडी प्रमुखांनी आपली मते मांडली .
शासनाने राज्यातील दहा मानाच्या पालखी सोहळ्यातील १५०० दिंड्याना वारकरी सन्मान योजने अंतर्गत २० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. याबाबत संस्थानचे धोरण काय? याबाबत ढवळीकर यांनी विचारणा केली असता, सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ म्हणाले, शासनाने दिंड्याची संख्या व नावे मागविली होती. ती आपण कळविली आहे. आपल्या जवळपास ६०० दिंड्या आहेत. ज्यांना अनुदान घ्यायचे आहेत त्यांनी ते घेण्यासाठी बॅंक नाव व खाते क्रमांक कळवावा.
आज सोहळ्यातील पहिले उभे रिंगण
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आज (रविवार) पहाटे योगी निरंजननाथ यांच्या हस्ते पहाटेची पुजा झाली. दिवसभर ढगाळ वातावरणात माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. माउलीला वाजत गाजत नैवेद्य आणण्यात आला. उद्या (सोमवार) माऊलींच्या सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होणार असून सोहळा तरडगांव मुक्कामी पोहोचेल.