कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेला जाताना गडबडीत औषध समजून कीटकनाशक पिल्याने ११ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे गावामध्ये ही घटना घडली आहे. वेदांत अशोक पाटील (वय-११) असे मृत शाळकरी मुलाचं नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत हा इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत होता. वेदांतने शाळेला जात असताना गडबडीत खोकल्याचं औषध समजून कीटकनाशक प्राशन केले.
त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने आईने तत्काळ पतीला फोन करुन घरी बोलावून घेत वेदांत याला तातडीने सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना आज त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आई, वडील व कुटुंबियांनी केलेला आक्रोश ह्दय हेलावून टाकणारा होता.