पुणे : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सण असो वा समारंभ असो नाहीतर सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी जातेवेळी तिकीट कन्फर्म होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी अनेकदा केल्या. आता प्रवाशांना दिलासा देण्यासाठी, देशात दहा हजार नॉन-एसी डबे तयार केले जाणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. यामुळे सामान्य रेल्वे प्रवाशांना रेल्वेत जागा मिळणे सोपे होणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी सरकारने भारतीय रेल्वेला आता 10 हजार नॉन-एसी डबे तयार करण्यास परवानगी दिली आहे. 2024-25 मध्ये 4485 आणि 2025-26 मध्ये 5444 डबे तयार केले जातील. यातील बहुतांश डबे सामान्य श्रेणीतील असतील. 2025-26 या आर्थिक वर्षात, रेल्वेने अमृत भारत जनरल कोचसह 2710 सामान्य डबे तयार करण्याची योजना आखली आहे. अमृत भारत स्लीपर कोचसह 1910 नॉन एसी स्लीपर, अमृत भारत एसएलआर कोचसह 514 एसएलआर कोच, 200 उच्च क्षमतेच्या पार्सल व्हॅन आणि 110 पॅन्ट्री कार तयार करण्याची योजना आहे.
रेल्वेच्या या योजनेमुळे सर्वसाधारण कोचची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेत जागा मिळणार आहे. जवळपास सर्वच एक्स्प्रेस अन् मेलमध्ये दोनच जनरल डबे असतात. त्यामुळे कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी गुरुवारी (दि.04) रेल्वे बोर्डाच्या कॅन्टीनची अचानक पाहणी केली. लंच टाईम भेटीदरम्यान मंत्र्यांनी कॅन्टीनमधील सुविधा आणि सेवांचा आढावा घेतला. या पाहणीवेळी रेल्वे बोर्डाचे सचिव आणि रेल्वे बोर्डाचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
राज्यमंत्री बिट्टू यांनी कॅन्टीन व्यवस्थापक आणि कर्मचा-यांशी संवाद साधून कामकाज आणि सेवांची माहिती घेतली. त्यांनी कॅन्टीनच्या विविध भागांना भेटी दिल्या. ज्यात कॅश काउंटर जेथे कर्मचारी जेवण कूपन जारी केले जातात. स्वयंपाकघर क्षेत्र जेथे अन्न तयार केले जाते आणि रस काऊंटर जेवणाच्या सुट्टीत त्यांनी रेल्वे बोर्डाच्या कर्मचा-यांशी संवाद साधला आणि जेवणाच्या दर्जाबाबत वैयक्तिक चौकशी केली.