पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने राज्यात चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे.सध्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, सातारा, सांगली या भागात दमदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर, जालना, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच जळगाव, धुळे, सोलापूर या जिल्ह्यातील तुरळक क्षेत्रात पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला असल्याचं पाहायला मिळत आहे.