अमरावती : अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात रात्री अचनाक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब सदृश्य स्फोट झाल्यानं मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हि घटना शनिवारी (दि. ०६) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अमरावतीचे सीपी-डीसीपी आणि बॉम्ब निकामी पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात शनिवारच्या रात्री अचनाक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ६ आणि ७ क्रमांकाच्या बॅरेकसमोर हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
रात्री कारागृहात फटाक्यांची आतषबाजी किंवा बॉम्ब फुटल्याप्रमाणे मोठा आवाज परिसरातील नागरिकांच्या कानावर पडत होता. घटनेची माहिती मिळताच कारागृह अधिकारी आणि अमरावती पोलीस आयुक्त आणि डीसीपीसह बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा तपास करण्यासाठी तातडीनं फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, शेजारच्या महामार्गाच्या कल्व्हर्टवरून फटाका किंवा बॉम्ब कारागृहात बॉलद्वारे फेकल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. कारागृहात बॉम्ब सदृश वस्तू फेकणारी व्यक्ती कोण? आणि असं का केलं? याचा सध्या कारागृह प्रशासनाकडून कसून तपास सुरू आहे.