मुंबई : नवाब मलिकांवरुन विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्यांने अजित पवारांना सल्ला दिला आहे. विधान परिषदेला मतांची गरज असली तरी सक्रीय राजकारणात मलिकांना सोबत घेवू नका. असं आवाहन त्यांनी अजित पवार यांना केलं आहे. नवाब मलिक महायुतीत नकोत म्हणून आता विश्व हिंदू परिषदेनंही आवाहन केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवतांमध्ये संघ मुख्यालयात भेट झाली होती. दोघांमध्ये महायुतीतली सद्य राजकीय स्थिती, लोकसभेचं नुकसान आणि आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. विश्व हिंदु परिषदेच्या नेत्यांसह संघ वर्तुळातील नेत्यांनीही नवाब मलिकांच्यावरुन नाराजी वर्तवल्याचं बोललं जातं आहे.
काही दिवसांपूर्वी विधानपरिषद निवडणुकांच्या बैठकीवेळी नवाब मलिक हे अजित पवारांच्या नेत्यांसोबत होते. दादा सत्तेत गेल्यानंतरच्या काही दिवसात मलिकांना जामीन मिळाला. जामिनानंतरच्या पहिल्याच अधिवेशनावेळी मलिक सत्ताधारी बाकांवर म्हणजे महायुतीच्या बाजूला जाऊन बसले होते. त्यावेळी फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहून जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. मात्र त्यावेळी अजितदादांनी त्यावर कोणतंही उत्तर दिलं नव्हतं.
मलिक मात्र मौन बाळगून
दोन प्रसंगावेळी नवाब मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत दिसले. मलिक अद्याप एकदाही शरद पवारांच्या बैठकीला गेलेले नाहीत. मलिक महायुतीत नकोत, म्हणून फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहिलं होतं., त्या पत्रावर फक्त बघू असं उत्तर अजितदादांनी त्यावेळी दिलं होत. शिंदे गटाची भूमिका आहे की मलिकांबाबत निर्णय अजितदादांनीच घ्यावा. अजितदादांचे नेते म्हणतात की मलिकांनी कुठे जावं हा निर्णय सर्वस्वी मलिकांचाच आहे. स्वतः नवाब मलिक मात्र यावर मौन बाळगून आहेत.
मलिक जामिनावर आहेत बाहेर
नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. पण आता ते अजित पवार यांच्यासोबत असल्याचे मानले जात आहे. NCP चे मोठे नेते नवाब मलिक हे NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी झालेल्या संघर्षामुळे चर्चेत होते. राज्यात सरकार बदलल्यानंतर मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली. यानंतर त्यांना ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला होता, सद्या मलिक हे जामिनावर बाहेर आहेत.