विजय लोखंडे
वाघोली : “स्वच्छता हीच सेवा ! करूया श्रमदान गावासाठी, स्वच्छ सुंदर केसनंद बनविण्यासाठी” या संकल्पनेतून केसनंद येथील ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रमोद हरगुडे यांच्या प्रमुख संकल्पनेतून २४ ते २९ जून या कालावधीमध्ये स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये केसनंद गावठाणातून बाहेर पडणारे सर्व सात रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण गाव व परिसर स्वच्छ करण्यात आले.
यामध्ये वाघोली रस्ता, लोणीकंद-राहू रस्ता, गावठाण परिसर, तळेरानवाडी/थेऊर रस्ता, वाडेगाव रस्ता, विद्यालय मैदाने, गावठाण शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तळेरानवाडी फूट वाट, बांगरवस्ती कमान परिसर आदी केसनंद गावातील संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती सरपंच प्रमोद हरगुडे यांनी दिली.
यामध्ये अदर पूनावाला ग्रुप, ऑफिसर्स करिअर अकॅडमी गावातील सर्व विद्यालय यांचे चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभले. समाज प्रबोधनकार ह. भ. प. संग्राम बापू भंडारे यांनी सांगता समारंभाच्या निमित्ताने स्वच्छतेच्या जनजागृती विषयी कीर्तन रुपी सेवा करून उपस्थित जनतेला स्वच्छतेचा एक चांगला संदेश दिला. याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.