पुणे : गेल्या काही महिन्यांपासून दौंड तालुक्यातील खुटबाव, गलांडवाडी , देलवडी, एकेरीवाडी , केडगाव,खोर, भांडगाव, अशा अनेक गावामध्ये बिबट्यांचे माणसांसह, पाळीव प्राण्यांवरील वाढते हल्ले ही चिंताजनक बाब बनली आहे. शुक्रवार (ता.०५) रोजी 2.15 च्या सुमारास देलवडी येथील टकले वस्ती या ठिकाणी राहुल टकले यांच्या गोठ्यातील पाळलेल्या मेंढी वरती बिबट्याने हल्ला केला. परंतु ही बाब रस्त्याने जाणाऱ्या एका चार चाकी गाडीवाल्याने तेथील नागरिकांना फोन व्दारे कळविली असता सर्व नागरिक गोळा झाल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.
ही घटना 200 फुटावरून पहात असतानाच, एका महिलेचे मागिल बाजूस लक्ष गेले असता त्यांच्या अगदी 70 ते 80 फुटावर दुसरा बिबट्या दबा धरुन बसल्याचे निदर्शनास आले. तर तेथून अगदी थोड्या अंतरावर असलेल्या मानसिंग गायकवाड यांच्या खुरवडेमध्ये असलेल्या तब्बल 25 ते 30 कोंबड्या फस्त केल्याची घटना सकाळी उघडकिस आली. यामुळे या वस्तीमध्ये 3 ते 4 बिबटे असल्याची शंका नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. वनअधकारी राहुल काळे (दौंड) संबधित घटनेची माहिती व बाईट साठी संपर्क केला असता फोन स्वीकारत नाहीत.
सद्यस्थितीत शिरूर तालुक्यातील पूजा नरवडे या युवतीचा व एका चार वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतल्याची घटना नवीन असतानाच आता पुन्हा दौंड, शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात मानवी वस्तीवर बिबट्यांचे वाढत चाललेले वास्तव्य आणि हल्ले या पार्श्वभूमीवर वन विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
मोठ्या प्रमाणावर वावर वाढत असताना देखील पंचनामे व पाहणी सोडून वनविभागाकडून कुठलेच पाऊल उचलले जात नाही. नागरिक अशा घटना घडून देखील वनविभागाला कळविणे टाळत आहेत. भविष्यात बिबट्यांची संख्या वाढतच राहिल आणि माणसांवरील हल्ले देखील असेच सुरू राहिले तर ग्रामीण भागातील नागरिकांना जगणे देखील कठीण होऊन बसेल? अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेमधून उमटू लागल्या आहेत. ‘बिबट्या हवा की माणूस? याचे उत्तर वनविभागाला द्यावेच लागेल.
शेतीपासून पैसे मिळावे म्हणून ऊस क्षेत्राकडे या भागातील शेतकरी वर्ग वळाला आहे. कोल्हापुरी बंधाऱ्याने कायम स्वरुपी पाणी उपलब्ध असल्यामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. उसाच्या बागायती क्षेत्रामुळे बिबट्यांचा वावर या भागात जास्त आहे. ऊसाचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने बिबट्यांना लपनक्षेत्र असल्यामुळे बिबट्यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. वनविभागाने त्वरीत बिबट्यांचा बंदोबस्त करून शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा.
ताराबाई टकले – उपसरपंच देलवडी