सुरेश घाडगे
परंडा : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवार ( ता. ८ ) परंडा शहरामध्ये महामोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज चौकातून या मोर्चास सुरुवात झाली. एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण, सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाचे बापाचे, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जवळपास लाखापर्यंत जनसमुदाय जमला होता . मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे व ओबीसी प्रवर्गातील ५० टक्क्याच्या चौकटीमधून आरक्षण द्यावे, अशी या आंदोलनातील प्रमुख मागणी होती.
या मोर्चाला तालुक्यातील ९६ गावनिहाय बैठका घेण्यात आल्या होत्या. सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा गफार शहा कोटला मैदान प्रांगणात आल्यानंतर राजमाता जिजाऊ वंदना झाली व आरती पाटील, सई पाटील, अक्षरा गोरे, राजलक्ष्मी पाटील व साक्षी कवडे या पाच विद्यार्थीनींची भाषणे झाली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी रोहीणी नऱ्हे यांना देण्यात आले व राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली .
या विराट मराठा आरक्षण महामोर्चात लाखोच्या संख्येने मराठा समाज एकवटला होता. मराठा समाजाला विदर्भ व खानदेशातील कुणबी मराठ्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गातुन ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे. मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा मराठा, मराठा हे सर्व एकच असल्याने मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा. मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्जमर्यादा व्याज परताव्यासाठी ५० लक्ष रुपये करण्यात यावी. मराठा समाजाला कुणबी समजण्याची अधिसूचना निर्गमित होईपर्यंत ०५ एकर जमीनीची अट शिथील करून इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळवा . आठ लाख रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व मराठा पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करावी. पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतीगृह जिल्हा व तालुका पातळीवर त्वरीत सुरु करण्यात यावेत. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी स्वामीनाथन आयोग लागु करावा. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दरम्यान महामोर्चा छत्रपती संभाजी महाराज चौक येथून प्रारंभ झालेला महामोर्चा नाथ चौक, संतसेना महाराज चौक-खासापुरी चौक, महाराणा प्रताप चौक -बावची चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,मार्गे कोटला मैदान- रुई रोड विराट सभा मंच स्थळ पोहचला जय जिजाऊ…. जय शिवराय…एक मराठा…. लाख मराठा….आरक्षण नाही….. मतदान नाही…..तुमच आमच नात काय…. जय जिजाऊ… जय शिवराय.. आदि घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता .मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध होता.
मोर्चात सर्व प्रथम घोडयावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज व मावळे असे सजीव लक्षवेधी चित्र सर्वांचं आकर्षण होते. विद्यार्थीनी, महिला, विद्यार्थी, सर्वसामान्य जनता नंतर शेवटी राजकीय, संघटना नेते,पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते अनुक्रमे मोर्चा मध्ये सहभागी झाले होते.
पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी, चार पोलीस निरिक्षक, २४ पोलीस उपनिरिक्षक, ७५ महिला पोलीस, २०० पोलीस असा चोख पोलीस बंंदोबस्त होता तसेच समन्वयक व स्वंयसेवक तैनात होते. सभामंचच्या उजव्या बाजूला महिलांची बैठक व्यवस्था होती .समोरील बाजूस शाळा कॉलेजच्या मुली, त्यानंतर महिला होत्या. मंचच्या डाव्या बाजूला पुरुषांची बैठक व्यवस्था होती. समोरील बाजूस शाळा कॉलेजची मुले त्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती व शेवटी लोकप्रतिनिधी, पक्ष, संघटनाचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी होते. या महामोर्चास सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळाला.
परिसरात भगवे झेंडे व सर्वात मोठा उंच भगवा झेंडा आकर्षण होते .मोर्चा प्रारंभ व मार्गावर भगवे झेंडे, स्वागत कमानी, फलक व भगवे टोपीधारक मोर्चेकरी आदिमुळे परंडा शहर गजबजून गेले होते. पाच मुलींनी केलेले तुफानी व मराठा समाजाची आजची अवस्था तथा वास्तव चित्र डोळ्यासमोर उभे करणारे ठरले.