मडगाव : गोव्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. भाड्याच्या खोलीत रहाणाऱ्या एका झारखंडच्या कुटुंबातील १८ महिन्यांच्या चिमुकलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी ५ जुलै रोजी बाणावली येथे घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत चिमुकलीचे कुटुंब नुकतेच कामाच्या निमित्ताने गोव्यात राहण्यास आले होते. ही घटना घडली त्यावेळी मुलीचे वडील कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. खेळत असताना मुलीचा विजेच्या वाहिन्यांशी संपर्क आल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विजेचा धक्का लागल्यामुळे बेशुद्ध झालेल्या चिमुकलीला कुटुंबातील लोकांनी रुग्णालयात दाखल केले, मात्र,डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणाचा पुढील तपास कोलवा पोलीस करत आहेत