लोणीकंद : गुन्हे शाखा तसेच लोणीकंद पोलिसांनी पेरणे गावच्या हद्दीत कोळपे वस्ती गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात २ हजार लीटर कच्चे रसायन ( तुरटी, नवसागर, गूळ मिश्रित ), लोखंडी बॅरल, ३५ लीटर तयार गावठी दारू असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी माधुरी रमेश परदेशी (वय-४७ रा. कोळपे वस्ती, पेरणे, ता. हवेली, जि, पुणे) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर केसनंद गावचे हद्दीत केसनंद ते वाडेबोल्हाई रस्त्यावर दुसरी कारवाई केली. या कारवाईत ताडीचे ८० फुगे असा एकूण ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पुनीत प्रवीण वडार (वय-२०, रा. ढोरेवस्ती, केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणे गावाच्या हद्दीत कोळपे वस्ती येथे ओढ्यालगत एक महिला भट्टी लावून दारू काढत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे याना मिळाली. त्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने अचानकपणे छापा टाकला.
यावेळी माधुरी परदेशी ही महिला हातभट्टी लावून दारू काढताना मिळून आली. तिच्या ताब्यातून २ हजार लीटर कच्चे रसायन (तुरटी, नवसागर, गूळ मिश्रित), लोखंडी बॅरल, ३५ लीटर तयार गावठी दारू असा एकूण ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच केसनंद गावचे हद्दीत केसनंद ते वाडेबोल्हाई रोडवर पुनीत वडार हा ताडी विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार समीर पिलाने आणि बाळासाहेब तनपुरे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता ताडीचे ८० फुगे असा एकूण ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस हवालदार रमेश मेमाने, संभाजी सकटे, पोलीस अंमलदार सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती नरवडे, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले या पथकाने केली.