पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर पुणे लोकसभा निवडणूक लढणारे उमेदवार वसंत मोरे यांना मोठा इशारा देण्यात आला आहे. वसंत मोरे यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. वसंत मोरे यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच वसंत मोरे यांचा येत्या 9 जुलैला ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार असल्याचीदेखील माहिती मिळत आहे. त्यामुळे पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच संतापले असल्याचे दिसत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष मिलिंद सरोदे यांनी वसंत मोरे यांना इशारा दिला आहे.
मिळालेल्या वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मिलिंद सरोदे यांनी तर वसंत मोरे यांना त्यांचं ऑफिसच फोडून टाकण्याचा जाहीर इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी मोरे बागेतील वसंत मोरेंच्या ऑफिस समोर मोठा बंदोबस्त वाढवला आहे. वंचितच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालय फोडण्याचा इशारा दिल्यानंतर वसंत मोरे यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी मिलिंद सरोदे यांना नोटीस सुध्दा बजावली आहे.
पोलिसांनी नोटीसमध्ये काय म्हटलं?
“आपणास याद्वारे कळविण्यात येते की, आपण वंचित बहुजन पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पसंत मोरे यांचे ऑफिस फोडायला चाललो आहे. पक्षाचा वापर करणारा उमेदवार यानंतर तयार झाला नाही पाहीजे. असे म्हणून त्यांच्यानिषेधार्थ आपण ०४/०७/२०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता वसंत मोरे यांचे कार्यालय फोडणार आहे, असा वॉट्सअॅप मेसेज प्रसारीत केला आहे.”
“वरील नमुद मेसेज आपण प्रसारीत केला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याअनुषंगाने आपणास नोटीस देण्यात येते की, मा. हिंमत जाधव पोलीस उप-आयुक्त पुणे शहर यांनी जा.क्र. पोउआ/विशा/पुणेशहर/७६१८/२०२४ पोलीस उप-आयुक्त सोो. विशेष शाखा पुणे शहर यांचे कार्यालयाकडील २३/०६/२०२४ रोजीच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (३) प्रमाणे प्रतिबंधात्कम आदेश पुणे शहर यांचे कार्यक्षेत्रात २५/०६/२०२४ रोजी ००.०१ या पासून ते ०८/०७/२०२४ रोजी रात्री बारा वाजेपर्यत पोलीस कार्यक्षेत्रात शांतता आणि सुव्यवस्था राखणेकामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येतील असे सर्व प्रकारचे निषेध आंदोलने, मोर्चे, रॅली इत्यादींना मनाई करण्यात आली आहे.”
“त्याअर्थी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४९ प्रमाणे कळविले कि, मा. जिल्हाधिकारी सोो. पुणे तसेच मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी पारित केलेले वरिल आदेशान्वये सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपण आपल्या मागण्या संवैधानिक मार्गाने पूर्ण करावी. त्यासाठी खाजगी व सार्वजनिक ठिकाणी रस्ता रोको, आंदोलने निदर्शने, आंदोलने, मोर्चे, प्रतिमांचे प्रदर्शन व वहन करुन वरिल संदर्भातील आदेशाचा भंग होईल असे वर्तन करु नये, आपल्या निषेध आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येवुन आपले विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.