पुणे : पुणे विभागाचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक व त्यांच्या पत्नीजवळ ज्ञात उत्पनापेक्षा जास्त मालमता आढळल्याप्रकरणी दोघांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात आज गुरुवारी (ता. 4) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण मसंत अहिरे (वय 46 वर्ष), तत्कालीन शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुणे (सध्या माध्यमिक शिक्षण अधिकारी, नंदुरबार) (वर्ग-1) व त्यांच्या पत्नी स्मिता प्रविण अहिरे (वय 41) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकसेवक प्रविण अहिरे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. लोकसेवक प्रविण अहिरे यांनी संपादित केलेल्या मालमत्ता कायदेशीर स्त्रोताद्वारे संपादित केली किंवा कसे? याबाबत त्यांना वेळोवळी संधी देवून माहिती घेण्यात आली होती.
दरम्यान, आरोपी लोकसेवक प्रविण अहिरे यांनी पद धारण केलेल्या कालावधीत प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किमतीची मालमत्ता स्वतःच्या व पत्नी स्मिता अहिरे यांच्या नावे आढळून आली आहे. त्यांच्याकडे सुमारे 31 लाख 78 हजार 200 रुपये (ज्ञात उत्पनापेक्षा 25.26 टक्के जास्त) किमतीची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादित केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीअंती उघड निष्पन्न झाले आहे.
सदर विसंगत बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी लोकसेवक प्रविण वसंत अहिरे यांना त्यांची पत्नी स्मिता अहिरे यांनी सहाय्य करुन गुन्ह्यास प्रोत्साहित करुन, अपप्रेरणा दिली. म्हणुन लोकसेवक प्रविण अहिरे (सध्या माध्यमिक शिक्षण अधिकारी, नंदुरबार) व त्यांची पत्नी स्मिता अहिरे यांच्याविरुध्द बंडगार्डन पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.