पुणे : सद्या शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रकार वाढताना दिसून येत आहे.आता अशातच पुण्यातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या व्यक्तीला दरमहा 5 टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून 57 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या सर्व प्रकाराची उमेश यशवंत पासलकर (वय-41 रा. जाजु वाडा, सदाशिव पेठ, पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश संजय भिलारे (वय-27 रा. दत्तवाडी पोलीस चौकी मागे, दत्तवाडी, पुणे ) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 21 जानेवारी 2019 ते 16 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर दरमहा 5 टक्के नफा देण्याचे आमिष दाखवले. आरोपीने फिर्यादी यांच्या कॅनरा बँक खात्यातून 57 लाख 34 हजार 260 रुपये ट्रान्स्फर करुन घेतले. हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणार असल्याचे सांगून पैशांचा अपहार केला. आरोपीने प्रॉमीसरी नोटमधील वायद्याप्रमाणे कोणतेही मुद्दल अथवा नफा न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.