शिरपूर (धुळे) : मैत्रिण म्हणाली, ‘तू पल्सरवर फिरताना छान दिसशील, एक पल्सर घेऊन टाक’तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मग त्याने पल्सरचा ध्यास घेतला. पण पैशांची जुळवाजुळव होत नव्हती. म्हणून त्याने चक्क बँक फोडण्याचा निर्णय घेतला. बँकेचे सेंट्रल लॉक उघडलेच नाही. त्यामुळे रिकाम्या हाताने परतावे लागले. ४८ तास उलटण्याच्या आतच पोलिसांनी त्याला अटक केली. १ जुलैला मध्यरात्री शिरपूरच्या मेन रोडवरील आर. के. कॉम्प्लेक्समधील वरच्या मजल्यावर बँक ऑफ इंडियाच्या शाखेची कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक कटरचा वापर करून कुलपे तोडल्याचे आढळले. मात्र शटरचे सेंट्रल लॉक न उघडल्याने नाइलाज झाल्याने चोरट्याला परत फिरावे लागल्याचे निष्पन्न झाले. व्यवस्थापक हर्शल पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला सुरवात केली. बँकेच्या परिसरासह संपूर्ण मांडळ रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. घटनास्थळावरील तुकड्यांवर सेंट्रिंग कामात वापरले जाणारे सळी कापण्याचे कटर वापरल्याचा अंदाज बांधून त्या दिशेने तपास केला. बांधकामाच्या साइट्स पोलिसांनी पालथ्या घातल्या.
दरम्यान, गुजराथी कॉम्प्लेक्सजवळ संशयित युवक सीसीटीव्हीत स्पष्टपणे टिपला गेला होता. घटनेची वेळ आणि संशयिताने पळ काढल्याचा कालावधी लक्षात घेता तो शहर परिसरातीलच रहिवासी असल्याचा संशय पोलिसांना आला. शहरातील एका वस्तीत असलेल्या इमारतीमधून पोलिसांनी संशयित विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. तो शहरातील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याने चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.
आणि पोलिसही झाले अवाक्..
चोरीच्या प्रयत्नामागील कारण ऐकल्यानंतर पोलिसही अवाक् झाले. संशयिताच्या मैत्रिणीने त्याला, ‘तू पल्सरवर फिरताना छान दिसशील, एक पल्सर घेऊन टाक’असे सांगितले होते. तिची मागणी पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्नशील होता. पण पैशांची उपलब्धता होत नसल्यामुळे तो मेटाकुटीला आला आणि चक्क बँक फोडण्याचा निर्णय त्याने घेतला.
वरिष्ठांकडून कौतुक
या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा ४८ तासांत यशस्वी तपास केल्याबद्दल पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी भागवत सोनवणे यांनी शहर पोलिसांचे कौतुक केले. निरीक्षक के. के. पाटील, उपनिरीक्षक संदीप दरवडे, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, पोलिस नाईक रवींद्र आखडमल, मनोज महाजन, आरिफ तडवी, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, भटू साळुंखे, सचिन वाघ यांनी ही कामगिरी बजावली.
अशी केली जुळवाजुळव
संशयिताचे काका सेंट्रिंग काम करतात. त्यांच्याकडे इलेक्ट्रिक कटर असल्याचे संशयिताने हेरले होते. त्यांच्याकडून बहाणा करून तो कटर घेऊन आला. बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानाच्या मीटरमधील इलेक्ट्रिक वायर कापून त्याने कटरची वायर जोडली. दोन कुलपे तोडण्यात यश आले पण सेंट्रल लॉकच्या जाडीचा अंदाज न आल्यामुळे त्याचा प्रयत्न फसला.