यवत : पहाटेचे आल्हाददायक वातावरण, पावसाची रिमझिम, सुर्यनारायणाचे दर्शन, टाळ-मृदंगाच्या गजरात उत्साहात पावले टाकणारे वारकरी, पालखीच्या दर्शनासाठी रस्त्यावर लोटलेला जनसागर, सकाळच्या कोवळ्या उन्हात उजळून निघालेला तुकोबांच्या पालखीचा चांदीचा रथ आणि ‘पुंडलिक वरद हरी विठ्ठल’ ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर, अशा भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखीला यवतकरांनी निरोप दिला.
यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात मुक्कामी असलेली संत तुकारामांची पालखी आज सकाळी वरवंडकडे मार्गस्थ झाली. पहाटे संत तुकारामांच्या पादुकांची महापूजा व काकड आरती झाली. आज सकाळी आठ वाजता पालखी वरवंड मुक्कामाला निघण्यापूर्वी पालखीची ग्राम प्रदक्षिणा झाली. यवत येथे ग्राम प्रदक्षिणेची ही अनेक वर्षांची परंपरा आहे. सकाळी आठ वाजता येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरातून या ग्राम प्रदक्षिणेला सुरूवात झाली.
यवत येथील ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन ग्राम प्रदक्षिणेला सुरूवात केली. मुख्य बाजारापेठेतून मारुती मंदिर, चांदणी चौक मार्गे शाळेच्या प्रांगणात प्रदक्षिणेचा समारोप करत आरती करण्यात आली व सेवा रस्त्यावर पालखी रथात ठेवण्यात आली. यवत ग्रामस्थांच्यावतीने वारकऱ्यांसाठी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
ग्राम प्रदक्षिणेच्या मार्गात विद्या विकास मंदिराच्या विद्यार्थिनींनी रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. मार्गात स्थानिक नागरिकांनी, महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी साडेआठच्या सुमारास यवत ग्रामस्थांचा निरोप घेत वरवंड मुक्कामाच्या दिशेने प्रस्थान झाला.
पालखीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच यवत, राहू बेट, पारगाव व यवत परिसरातील नागरिकांनी पालखीमार्गाच्या दुतर्फा गर्दी केली होती. शालेय विद्यार्थी, नोकरदारवर्ग, तरुण तरुणी यांची संख्या लक्षणीय होती. पारंपारिक वेशभूषा करून महिला व लहान मुल पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
आपल्या मोबाईलमध्ये पालखीचे फोटो टिपण्यासाठी नागरिक गर्दी करत होते. कपाळावर गंध रेखाटून मोबाईलमध्ये सेल्फी देखील घेतले जात होते. पालखी मार्गावर अनेक भाविक व संस्थांनी चहा, पाणी व अन्नदान केले. पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाल्यानंतर काही सामाजिक संस्थांच्या वतीने पालखीमार्गावर स्वच्छता मोहिमही राबविण्यात आली.
सकाळी 10 वाजता पालखी भांडगाव येथे विसाव्यासाठी थांबली. याठिकाणीही भाविकांनी रांगा लावून संत तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी पालखी सोबत दिंड्यांतील वारकऱ्यांनी देखील न्याहारीसाठी विसावा घेतला.