शिक्रापूर : येथे २ जुलै रोजी एका चालत्या कारने पेट घेतल्याची घटना घडलेली असताना त्याच दिवशी सायंकाळी एका दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागल्याने दुकानाचे नुकसान झाले. शिक्रापूर ता. शिरुर येथील स्टेप वालपेपर दुकानाचे मालक अमोल ठाकरे सायंकाळच्या सुमारास दुकान बंद करुन घरी गेले असता, रात्रीच्या सुमारास दुकानातून जाळ व धूर बाहेर पडत असल्याचे नागरिकांना दिसले. घटनेची माहिती मिळताच अमोल ठाकरे, पोलीस नाईक प्रताप कांबळे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत अग्निशामक व नागरिकांच्या मदतीने आग विझवली. मात्र सदर आगीमध्ये दुकानातील साहित्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत अमोल भगवान ठाकरे (वय ३२ रा. चासकमान कॉलनी शिक्रापूर ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात जळीत प्रकरणी नोंद केली.