पिंपरी : भागीदारीतील व्यवसायाचा विस्तार करण्याच्या बहाण्याने भागीदाराच्या नावावर एक कोटी ५५ लाखांचे कर्ज काढून परस्पर जमिनी खरेदी करून फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवारी (दि.२) सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुदर्शन गणपत बालवडकर आणि त्याची पत्नी (दोघेही रा. सेलीब्रेशन अपार्टमेंट, बालेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. संजय काळुराम दळवी (वय ३७ रा. सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २५ ऑक्टोबर २०२२ ते ११ जानेवारी २०२४ या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली. फिर्यादी दळवी आणि आरोपी सुदर्शन याची पत्नी यांचा भागीदारीत पिंपळे निलख येथे सीएनजी पंप आहे.
आरोपी सुदर्शन याने श्रीपती इंटरप्रायझेस फर्मचा विस्तार वाढविण्यासाठी बालेवाडी येथे पाच गुंठे जागा फर्मच्या नावाने घेऊ, असे फिर्यादी दळवी यांना सांगितले. फिर्यादी यांच्या परिवाराचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांचे वडिल काळुराम सिताराम दळवी, भाऊ संदीप दळवी व श्रावी एम्पायर सोसायटी, पिंपळे निलख येथे फिर्यादी यांच्या नावावर असलेली सदनिका फेडरल बँकेच्या विमाननगर शाखेत गहाण ठेवून बँकेकडून एक कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. तसेच कर्जाच्या त्या पैशाच्या वापर श्रीपती एंटरप्रायझेस फर्मच्या विस्ताराकरिता न करता बालेवाडी येथील मंगलदास जैन यांच्या मालकीची बालेवाडी येथील पाच गुंठे जमीन एक कोटी ५५ लाख रुपयांना खरेदी केली. ही जमीन स्वतः व पत्नीच्या नावावर खरेदी करून दळवी परिवाराची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.