पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात ओळख पत्राशिवाय विद्यार्थी तसेच अन्य कुणालाही प्रवेश करता येत नाही. ही प्रवेश नियमावली कटाक्षाने पाळण्यासाठी सुव्यवस्थित कार्यप्रणाली कार्यान्वित केल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत बुधवार ३ जुलै रोजी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे अमली पदार्थ सापडल्याच्या घटनेबाबत विक्रम काळे यांनी लक्षवेधी मांडली होती. मंत्री चंद्रकांत पाटील या लक्षवेधीवर उत्तर दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडलेल्या या घटनेची गांभीर्याने नोंद घेण्यात आली आहे. या घटनेबाबतचा एफआयआर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला असून, घटनेवेळी जप्त केलेले साहित्य पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतले आहे. त्यानुसार पोलीस यंत्रणेमार्फत याबाबतची पुढील कार्यवाही सुरू असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. संबंधित विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेश रद्द केला आहे. त्याच्या पालकांनाही याबाबत योग्य ती समज दिली आहे.
तसेच या घटनेबाबतचा योग्य तो तपास करण्यासाठी कुलगुरुंनी तज्ज्ञांची चार सदस्यीय समिती गठित केली असून, समितीचे कामकाज सुरू झाले आहे. पुणे विद्यापीठ परिसरात अशी घटना यापूर्वी कधीही घडलेली नाही. तसेच अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी विद्यापीठ प्रशासन काळजी घेत आहे. तसेच आवश्यक ती सर्व कार्यवाही विद्यापीठामार्फत करण्यात येत असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.