पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत असताना देखील या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, अशी कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधिमंडळात दिली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात आमदार भिमराव तापकीर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ च्या लांबीमध्ये सुमारे एक लाख २० हजार वाहने प्रतिदिन प्रवास करतात. महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्ता दुरुस्तीचे काम रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजूर केले होते. या महामार्गावर हडपसर ते मांजरी स्टड फार्म दरम्यान २१.०१ कोटी रुपयांचे काम रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून नोव्हेंबर २०२३ मध्ये मंजूर केले. काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक वर्दळ असल्याने काही ठिकाणी खडी निघून गेल्याचे निदर्शनास आले होते. या ठिकाणचा रस्ता संबंधित कंत्राटदाराकडून पूर्ववत करण्यात आला आहे, असं देखील चव्हाण यांनी म्हटले आहे.