नवी दिल्ली: T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ अखेर भारतात पोहोचला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विश्वविजेत्या संघासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली होती, जेणेकरून रोहित शर्मासह टीम आणि प्रसारमाध्यमांना मायदेशी परतता यावे. एअर इंडियाचे विमान AIC24WC आज (दि. 4) सकाळी भारतात पोहोचले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ, सहाय्यक कर्मचारी, बीसीसीआयचे काही अधिकारी आणि खेळाडूंचे कुटुंबीय चक्रीवादळ बेरीलमुळे बार्बाडोसमध्ये अडकले होते. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत संघाने विजेतेपद पटकावले. यानंतर टीम तेथील हॉटेलमध्येच होती.
टीम इंडिया भारतात परतली
अंतिम सामना जिंकल्यानंतर, भारतीय संघ नियमित विमानाने भारतात परतणार होता. परंतु, बार्बाडोसमध्ये चक्रीवादळामुळे कर्फ्यूची परिस्थिती होती. सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून खेळाडू आणि कर्मचारी त्यांच्या हॉटेलमध्ये अडकून पडले होते. त्यानंतर सरकारकडून एक विशेष विमान बार्बाडोसला पाठवण्यात आले. भारतीय संघाच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळाबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. टीमच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक पोहोचले. त्यांची 17 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. भारताने यापूर्वी 2007 मध्ये तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकला होता.
भारतीय संघ सकाळी 11 वाजता पंतप्रधानांना भेटणार
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ सकाळी 6 वाजता दिल्लीला पोहोचेल. यानंतर ते सकाळी 11 वाजता पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. यानंतर रोहित शर्मा आणि कंपनी विशेष विमानाने मुंबईला रवाना होतील. त्यांच्या सन्मानार्थ येथे विजयी परेड काढण्यात येणार आहे. याशिवाय भारतीय संघाला वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयने जाहीर केलेली 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कमही दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, “बीसीसीआयने भारतीय संघाला परत आणण्यासाठी एअर इंडियाचे एक विशेष विमान पाठवले होते. याशिवाय अडकलेल्या माध्यमांनाही याच विमानाने परत आणले जात आहे. ते उद्या सकाळी 6 वाजता दिल्लीला पोहोचतील. “पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी संघाच्या स्वागत समारंभाचे आयोजन केले आहे. त्यानंतर ते मुंबईला रवाना होतील, तेथे त्यांच्या सन्मानार्थ नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी एका स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. स्टेडियम, जिथे भारतीय क्रिकेट संघ, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा सत्कार केला जाईल आणि त्याला BCCI ने जाहीर केलेले 125 कोटी रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.”
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट करून पुष्टी केली की, भारतीय संघाचे मुंबईत 4 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी विजयी परेड काढण्यात येणार असून ती मरीन ड्राइव्हपासून सुरू होऊन वानखेडे स्टेडियमपर्यंत जाईल.
मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था
नवी दिल्लीहून आल्यावर विजयी संघ खुल्या बस रोड शोमध्ये भाग घेईल आणि त्यानंतर दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सत्कार समारंभ होईल. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, मिरवणूक पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने जमतील, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस पूर्ण खबरदारी घेत आहेत. नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान मरिन ड्राइव्हवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.