यवत : जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील मुक्काम आटोपून दौंड तालुक्यातील यवत नगरीत विसावला आहे. यवतनगरीत गेल्या ५५ वर्षापासून अखंडीतपणे वारकऱ्यांना पिठलं भाकरीचे भोजन दिले जाते. दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा यवतमधील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावत असतो.
लोणी काळभोर येथून निघाल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास पालखीचे दौंड तालुक्याच्या वेशीवर बोरीभडक येथे दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपाच्या कांचन कुल, दौंडचे प्रांतअधिकारी मिनाज मुल्ला, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांसह विविध राजकीय व प्रशासकीय अधिकारी यांनी पालखीचे स्वागत केले.
यानंतर सोहळ्याचे सहजपूर, जावजीबुवाची वाडी, कासुर्डी येथे विश्रांती घेऊन ज्ञानोबा- माऊली – तुकाराम, माऊली- माऊली, टाळ मृदुंगाच्या तालावर भगव्या पता का घेऊन भक्तिमय वातावरणात सर्वात लांब असलेल्या २५ कि. मी. अंतर पार करत पालखी सोहळा रात्री ०८.४५ च्या सुमारास यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे विसावला. पालखी मार्गावर विविध सामाजिक संस्था, मंडळांनी यांनी चहा- बिस्किट व अल्पोपहाराची सोय केली होती. यवत नगरीत सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव , ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान कमिटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत गावात आल्यानंतर वारकऱ्यांना एक वेगळाच आस्वाद दिला जात असतो. गेल्या अनेक वर्षा पासून अखंडीत पणे वारकऱ्यांना पिठलं भाकरीचे भोजन दिले जाते. दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा यवतमधील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावतो. या ठिकाणी आल्यानंतर तहसीलदार अरुण शेलार, नायब तहसीलदार गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नायब तहसीलदार तुषार बोरकर, हभप नाना महाराज दोरगे, श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश दोरगे, विनायक दोरगे, यांसह मान्यवरांच्या हस्ते समाज आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.