संतोष पवार
पळसदेव : शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ मध्ये STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता निहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने या चाचणीचे आयोजन करण्यात येत असते. संपूर्ण वर्षभरामध्ये एकूण तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पहिली पायाभूत चाचणी दिनांक १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीमध्ये घेण्यात येणार असून सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच सर्व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे. पायाभूत चाचणी ही मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम आणि मूलभूत क्षमता यावर आधारित असून एकूण दहा माध्यमात घेण्यात येईल.
तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांची ४० गुणांची पाचवी ते सहावी साठी ५० गुण आणि सातवी ते नववी साठी ६० गुणांची ही परीक्षा असेल. पायाभूत चाचणी दहा ते बारा जुलै, संकलित मूल्यमापन चाचणी- १ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, संकलित मूल्यमापन चाचणी २ एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे, यांनी परिपत्रकाद्वारे कळविल्या आहेत.