पुणे : पुणे शहर रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असतं. त्यात सध्या पुण्यातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये दिवेघाटातून येताना तरुण अॅम्बुलन्सला लटकून प्रवास करत असल्याचे दिसत आहेत. संबंधित प्रकार हा मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आलं आहे.
संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (दि.02) दिवे घाट सर करून सासवडला मुक्कामी पोहचला. विठू माऊलीच्या जय घोषाने दिवे घाट दुमदुमला होता. दिवेघाटातील पालखी सोहळ्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेक भक्तजणांनी गर्दी केली होती. पालखी सासवडला पोहोचल्यानंतर दिवे घाटात प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी पुण्याकडे मिळेल त्या वाहनाने नागरिक घरी जाण्यासाठी निघाले होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणा-या त्या व्हिडिओमध्ये दिवे घाटाकडून हडपसरकडे येताना रात्रीच्या वेळी काही तरुण ॲम्ब्युलन्सला लटकले असल्याचे दिसत आहे. ही ॲम्ब्युलन्स वारकऱ्यांसाठी देण्यात आली आहे. मात्र ॲम्ब्युलन्सच्या मागच्या बाजूला काही तरुण धोकादायकरित्या प्रवास करत असल्याचे दिसत आहेत. यावेळी रुग्णवाहिका अधिक वेगाने रस्त्यावर धावत होती. त्यावेळी हडपसर मार्गे गाडी मिळत नसल्याने हा धोकादायक प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे.
दिवे घाटातून प्रवास करताना चार तरुण चक्क अॅम्बुलन्सच्या मागच्या बाजूला उभे असल्याचे दिसून येत आहे. काही स्थानिक नागरिकांनी हा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. असा जीवघेणा प्रवास कुणाच्याही जीवावर बेतू शकतो. त्यामुळे अशा प्रवास करणाऱ्यांना आळा बसवणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे