पुणे : येरवड्यातील बालसुधारगृहात जोरदार राडा झाला आहे. पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात मुलाच्या डोक्यात फरशी मारून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (३० जून) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी बालसुधारगृहातील काळजीवाहू (केअरटेकर) महेश चंद्रकांत जाधव (वय-३७) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, येरवड्यात पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र संचलित बालसुधारगृह आहे. रविवारी बालसुधारगृहातील मुलांना रांगेत उभे करण्यात आले होते. त्यावेळी एका मुलाने दुसऱ्या मुलाच्या डोक्यात फरशी (टाइल) मारुन त्याला जखमी केले. त्यावेळी बालसुधारगृाहतील कर्मचाऱ्यांनी टाइल मारणाऱ्या मुलाला पकडले.
बालसुधारगृहात झालेल्या वादातून मुलाला मारहाण करण्यात आली असून मारहाण करणाऱ्या मुलाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देसाई करत आहेत.