योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहमी वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारा बबलू उर्फ अभिजित चक्रधर पऱ्हाड (वय-२५ वर्षे रा. पऱ्हाडवाडी केंदुर ता. शिरुर) याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावानंतर अखेर त्याला एक वर्षासाठी एमपीडीए कायद्याअंतर्ग स्थानबद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिली आहे.
सराईत गुन्हेगार बबलू हा वारंवार खून, जीवे मारण्याची धमकी देणे, खंडणी मागणे, पिस्तुल बाळगणे यांसह आदी स्वरूपाचे गुन्हे वारंवार करत होता. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अशा गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, महेश बनकर, रामदास बाबर, विकास पाटील, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, प्रतिक जगताप, किशोर शिवणकर, निखील रावडे यांच्या माध्यमातून पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या बबलू पऱ्हाड यांच्याविरुद्ध प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे सादर केला.
त्यांनी तो प्रस्ताव पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांनी बबलू उर्फ अभिजित चक्रधर पऱ्हाड याच्या विरुध्द एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्ष स्थानबद्धतेचे आदेश दिले आहे. दरम्यान, बबलू पऱ्हाड याला पोलिसांनी ताब्यात घेऊन एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केलं.
त्याचबरोबर शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या, नागरिकांना त्रास देणाऱ्या, ठेक्यातून वाद निर्माण करणे, कंपन्यांना त्रास देणे, खंडणी मागणे, बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या अनेक गुन्हेगारांची यादी सध्या तयार करण्यात आलेली असून त्यांच्यावर देखील मोक्का, तडीपारी यांसह आदी स्वरूपाच्या कारवाई करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले.