पुणे : पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावत असतानाच पोलीसाने दाखलेल्या कर्तव्य तत्परतेमुळे एका आईने गोंडस मुलाला जन्म दिला. नाजूक अवस्थेत असलेल्या एका महिलेला तिच्या बाळाला जन्म देण्यास मदत केल्यामुळे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी बाळासाहेब तळोले यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकार?
शिक्रापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीमधील नाईट राउंड पेट्रोलिंग सुरु असताना हॉटेल साईसागर, मलठण फाटा येथे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील अस्मिता मोहन दांडगे या महिलेची डिलेव्हरीची तारीख जवळ आली होती. तिच्या पोटात दुखायला लागल्याचे समजताच ते पुण्यावरुन गावी निघाले होते. अस्मिता यांच्यासोबत त्यांच्या सासू, आई आणि लहान मुलगी अशा चौघीजण सोबत होत्या. अचानक वाटेतच अस्मिताच्या पोटात दुखायला लागलं. त्यावेळेस आजुबाजूला तिच्या घरच्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यावेळी मदतीसाठी चक्रधारी पोलीस हवालदार बाळासाहेब तळोले हे देवासारखे धावून आले.
तेव्हा त्या परिसरात मदतीसाठी कोणीही दिसले नाही. तेव्हा तळोले यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अस्मिता यांच्या घरच्यांची परवानगी घेऊन अस्मिता यांना दोन पायावर खाली बसवले व त्यांचे खांदे दाबून त्यांना जोर लावायला लावला आणि तितक्यात रस्त्याच्या बाजूला एका मोकळ्या पटांगणात अस्मिता यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. काही वेळानंतर अस्मिता यांना ॲम्बुलन्समध्ये बसवून लहान बाळासह हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि मोशी, पुणे येथील बाळाच्या वडिलांना फोनवरून सुखद बातमी कळवली. सध्या आई आणि बाळ (मुलगा) सुखरूप आहेत.
पोलीस अधिकारी म्हणून ड्युटी करत असताना अनेक अनेक चांगले वाईट प्रसंग येतात. पोलीसांना दैनंदिन कामकाज करताना अनेक भूमिका निभावाव्या लागतात पण आज चक्क त्या पोलीस अधिका-यास डॉक्टरांचे काम करावे लागेल आणि तेही काम यशस्वी झाले.