लोणी काळभोर : संत निरंकारी मिशनकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील संत निरंकारी सत्संग भवनात रविवारी (ता, ३०) करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या शिबिरात १६१ युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मिशनचे पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश घुले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजित आबा घुले, लोणी काळभोर मुखी राहुल काळभोर, पुणे सीटीचे क्षेत्रीय संचालक अवनीत तावरे, आव्हळवाडी सेक्टर संयोजक दत्तात्रय सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिराच्या जनजागृतीसाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक, तसेच सेवादल यांनी पथनाट्य, रॅलीचे आयोजन लोणी काळभोर, मांजरी, आव्हाळवाडी, उरुळी कांचन, केशवनगर, हिंगणगाव, वाडे बोल्हाई परिसरात केले होते. या शिबिरात १६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. रक्तदानासाठी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
दरम्यान, ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी रक्त संकलित करण्याचे कार्य केले. तर हे शिबीर यशस्वी होण्यासाठी ससूनचे समाजसेवा अधीक्षक शरद देसले, डॉ. श्रद्धा जैन व त्यांच्या सहकाऱ्यांची बहुमूल्य योगदान दिले. तर या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मांजरी बुद्रुकचे मुखी रोहिदास घुले यांनी मानले.