पुणे : संभाजी भिडे गुरुजी हे आपल्या वक्तव्यामुळे सतत चर्चत असतात. अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संभाजी भिडे या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. वटसावित्रीच्या पूजेला महिलांनी कुठला पोशाख घालावा याबाबत बोलताना संभाजी भिडे यांची जीभ घसरली आहे.
ते म्हणाले, वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी देखील जाऊ नये. या पूजेला साडी नेसलेल्या महिलांनीच जावं, असं वक्तव्य भिडे गुरुजी यांनी केलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते, त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे?
संभाजी भिडे म्हणाले कि, वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा असून रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचा आपला मानस आहे. असं बोलतानाचं ते म्हणले, वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी देखील जाऊ नये. या पूजेला साडी नेसलेल्या महिलांनीच जावं, असं विधान संभाजी भिडे गुरुजी यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आपल्याला मिळालेलं हांडगं स्वातंत्र्य आणि दळभद्री : भिडे
तसेच पुढे बोलताना म्हणाले, गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या सात मातांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे, म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत आहे, ह्या व्रताची पथ्य आहेत. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आहे. अशा 10-10 हजारांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत. आपल्या जे स्वातंत्र्य मिळालं ते हांडगं स्वातंत्र्य आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खर स्वतंत्र आहे असंही संभाजी भिडे यावेळी म्हणाले.