संतोष पवार
पळसदेव : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असून सुसंस्कारित आणि जबाबदार पिढी घडविण्यांचे काम शाळांमध्ये घडते. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रासाठी शासनाकडून महत्वपूर्ण योगदान घडावे आणि शैक्षणिक मागण्यांचा शासन दरबारी गांभीर्याने विचार होऊन त्यास तात्काळ मंजुरी मिळावी, असे प्रतिपादन पुणे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले. २८ जून रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
माध्यमिक शाळांमधील रिक्त जागांचा अनुशेष भरून काढणे, जुलै अखेर नवीन शिक्षक – शिक्षकेत्तर पदभरती व्हावी, १५ मार्च २०२४ चा नवीन संच मान्यता आदेश रद्द व्हावा, अंशतः अनुदानित तुकड्यांना विनाअट अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा, जुन्या पेन्शन योजना लागू करावी या मागण्यांसाठी शुक्रवार २८ जून रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील १५ ऑगस्ट चौकातील मुख्याध्यापक भवनापासून ते शिक्षण आयुक्त कार्यालयपर्यंत महामोर्चा काढण्यात आला. सदरच्या मागण्यांचे निवेदन शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी, संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष विजय कोलते, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजीराव खांडेकर, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, राज्य आश्रमशाळा उपाध्यक्ष तुकाराम शिरसाठ, टीडीएफचे शिवाजी कामथे, शिक्षक परिषदेचे गुलाबराव गवळे, निलेश काशिद, भानुदास रिठे, सुजित जगताप आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.