नवी दिल्ली : बँकाचे एनपीए अर्थात ‘नॉन परफॉर्मन्स अॅसेट्स’चे प्रमाण 2024-25 च्या अखेरीस 2.5 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. याबाबतचा अहवालही जारी करण्यात आला आहे. अहवालानुसार, बँकांच्या सर्व श्रेणींमध्ये सकल एनपीए कमी झाला आहे.
2023-24 च्या दुसऱ्या सहामाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एनपीए प्रमाण 0.76 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे बुडीत कर्जात घट झाली आहे. या अहवालात म्हटले की, मार्च 2020 पासून सकल एनपीए गुणोत्तरामध्ये सातत्याने झालेली घसरण मुख्यत्वे नवीन बुडीत कर्जांच्या वाढीमध्ये सतत घसरण झाल्याचे दिसत आहे. राईट-ऑफमध्ये वाढ झाल्यामुळे हे दिसत आहे.
ग्रॉस एनपीएमध्ये घट झाल्यामुळे राईट-ऑफ रेशो एक वर्षापूर्वीच्या समान पातळीवर राहिला आहे. 2013-22 मध्ये त्याचे सरासरी प्रमाण 20 टक्के होते. रिझर्व्ह बँकेनुसार, वर नमूद केलेल्या बचतींमध्ये निव्वळ आर्थिक बचत 39.8 टक्क्यांवरून 28.5 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.