पुणे : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनाला अवघ्या काही दिवसांचा कालावधी असून श्री क्षेत्र देहू येथून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. पालखी सोहळाच्या तोंडावरच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. यामुळे अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यवत येथे सेवा रस्ता सुरू होतो तेथेच सेवा रस्त्यावर चढ-उतार, स्टेशन रोड, गजानन इलेक्ट्रिक, एसटी स्टँड परिसर, ओढ्यावरील पूल, शाळेच्या जवळ अशा अनेक ठिकाणी पाणी साठत आहे. महालक्ष्मी हॉटेल, स्टेशन रोड, शाळा या परिसरात साठलेली माती आणि पडलेले खड्डे व पाणी यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा अपघात देखील घडलेले आहेत. अचानक खड्डा आल्याने अनेक दुचाकीस्वार पडत आहे. महालक्ष्मी हॉटेल समोर रस्त्यावर माती साठल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. श्री काळभैरवनाथ मंदिरा शेजारी असलेल्या महामार्गापुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दि. ३ जुलै रोजी दौंड तालुक्यात आगमन होत असून पालखी यवत मुक्कामी येत आहे.
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी पालखी व्यवस्थापक आणि प्रशासनाने केली आहे. पालखी महामार्गावर कोणतेही प्रकारची गैरसोय होऊ नये, याची दक्षता प्रशासन दरवर्षी घेत असते. यंदाही जिल्हाधिकारी सुहास दिवसे व शासकीय अधिकाऱ्यांनी पालखी महामार्गाची पाहणी केली. काही दिवसांपूर्वी आमदार राहुल कुल यांनी पालखी स्थानांना भेट दिली असून यावेळी महामार्ग प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु पालखी महामार्गावर अनेक समस्या आहेत.
पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील यवत, चौफुला , वरवंड, पाटस सेवा रस्त्यांवर खड्डे पडल्याने दुरावस्था झालेली आहे. सेवा रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे, सेवा रस्त्यावर आलेली माती तात्काळ बाजूला करून पाणी साठणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात, यवत गावातील मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची प्रामुख्याने तात्काळ दुरुस्ती करावी, अशा मागण्या यवत परिसरातील नागरिक करीत आहेत.
सेवा रस्त्यावरील भुयारी गटारात गाळ साठल्याने पाणी वाहून जात नाही, प्राथमिक शाळेसमोर असलेल्या भुयारी मार्गामध्ये असलेले दिवे देखील बंद आहेत, यावर उपाययोजना केल्या असूनही परिसरात पाणी साठत असल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. कासुर्डी ते यवत पालखी प्रवास करतेवेळी परिसरात अंधार होत असल्याने या परिसरात तात्पुरत्या स्वरूपाचे दिवे लावण्याची मागणी देखील नागरिक करत आहेत.