सोलापूर : अवैध वाळू वाहतूक करताना जप्त केलेले टाटा मेगा पिकअप वाहन सोडविण्यासाठी ५ हजार रूपये लाच घेताना नायब तसीलदार आणि महसूल कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्या दोघांविरूध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याचीही चौकशी केली जात आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरच्या पथकाने केली.
नायब तहसीलदार प्रकाश विश्वनाथ सगर (वय-५५) आणि महसूल सहायक विवेक विठ्ठल ढेरे (वय-३२) अशी लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मंगळवेढ्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोला तहसीलदार यांनी तक्रारदार यांचे टाटा मेगा पिकअप वाहन २०२० साली अवैध वाळू वाहतूक करताना पकडले होते. त्यावर १ लाख ३७ हजार ६८४ रूपये दंड आकारला होता. त्यानुसार तक्रारदाराने शासकीय चलनाद्वारे दंडाची रक्कम भरली होती.
तसेच जप्त केलेले वाहन सोडवण्यासाठी मंगळवेढ्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक होती. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यानुसार तेथे अर्ज केला होता. मात्र, वाहन सोडवण्यासाठी तेथीला नायब तहसीलदार सगर आणि महसूल सहायक ढेरे यांनी स्वतःसाठी आणि उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी २० हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तडजोडीअंती दहा हजार रूपयांची लाच देण्याचे ठरले.
याबाबत तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणाची पडताळणी करून मंगळवेढ्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा रचून ५ हजार रुपये पहिला हप्ता घेताना विवेक ढेरे यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलिस अंमलदार अतुल घाडगे, सलीम मुल्ला, स्वामीराव जाधव, राहुल गायकवाड यांनी केली.