मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करताना वारकरी संप्रदायाबाबत मोठी घोषणा केली. आषाढी वारीतील दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये निधी, वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, वारीला जागतिक वारसा नामांकन मिळवून देणे आणि मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
संत तुकोबारायांच्या अंभगाने केली सुरुवात
उदंड पाहिले उदंड ऐकिले | उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ||ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर | ऐसा विटेवर देव कोठे || ऐसे संतजन ऐसे हरिदास | ऐसा नामघोष सांगा कोठे || तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे | पंढरी निर्माण केली देवे || अजित पवार यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचं वाचन करुन अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अजित पवार यांनी बोला पुडंलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्राची नाळ वारकरी भक्तिमार्गाने जोडलेली आहे. याची जाणीव असल्यानं महाराष्ट्राची ओळख म्हणून पढंरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी यूनेस्कोकडे प्रस्ताव पाठवत आहोत. आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांविषयी कृतज्ञता म्हणून प्रति दिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पहिलीच तरतूद ही वारकऱ्यांसाठी करण्यात आली. देहू आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी केली जाणार आहे. मोफत औषध देणार आहोत. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. यावेळी केलेल्या घोषणेमुळे वारकरी दिंड्यांना मोठा फायदा होईल. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असल्याने आणि मोफत औषध देण्यात येणार असल्याने वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.