मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या अर्थसंकल्पात इंधन दरात घट करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरात पेट्रोल-डिझेलचा दर बऱ्यापैकी स्वस्त होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे वरुन २५ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे ६५ पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे २ रुपये ७ पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
“2024-25 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा सुधारित कर अंदाज ३,२६,३९७ कोटी आहे. या आर्थिक वर्षाच्या महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दीष्ट ३,४३,०४० कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग केंद्रांना दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल-डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे”, असं अजित पवार म्हणाले.