पुणे : पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महाविद्यालयीन तरुणाचा १० ते १५ जणांच्या टोळक्याने खून केला आहे. ही घटना रविवार (ता.६ ) ला रात्री घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
प्रणव उर्फ जय मांडेकर ( वय- १९ वर्षे ) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण इंद्रायणी कॉलेजमध्ये एफ. वाय. बी. कॉमचे शिक्षण घेत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रणव हा मित्राचा वाढदिवस आहे असे सांगून घराबाहेर पडला होता. रात्री साडे नऊच्या सुमारास आई स्वाती यांनी प्रणवला फोन केला तेव्हा त्याने जेवण झाले असे सांगितले. त्यानंतर प्रणव मित्रांसमवेत एका कट्ट्यावर बसला. तेंव्हा वीस जणांचा टोळका त्यांच्या दिशेने आले. काहींच्या हातात कोयता असल्याचे पाहून प्रणव आणि त्याचे मित्र जीव वाचवण्यासाठी धावू लागले. या टोळक्याने त्यांचा पाठलाग करून हल्ला केला. यात प्रणवचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, दीड तास उलटला तरी मुलगा का आला नाही म्हणून पुन्हा आईने फोन केला आणि तो फोन तळेगाव पोलिसांनी उचलला आणि प्रणवचा खून झाल्याचे आईला सांगितले. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर समजले की, प्रणवच्या सोबत असलेल्या विशालचे मंगेश सोबत फोनवर बाचाबाची झाली होती यातूनच हा प्रकार घडल्याचा त्यांना सांगण्यात आले. याप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यात अल्पवयीन मुलांचा आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ही समावेश आहे. तर या घटनेचे मूळ कारण अद्यापही समोर आलेले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.