अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत त्यांचे घर सील केले आहे. महापालिकेतील लिपिक शेखर देशपांडे याच्यामार्फत त्यांनी लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त आणि लिपिक हे फरार झाले आहेत. याप्रकरणी एसीबीने डॉ. पंकज जावळे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
अहमदनगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बांधकाम परवानगी देण्यासाठी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी ही परवानगी पाहिजे होती. याच प्रकरणात 19 आणि 20 जून रोजी ही लाच मागण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर एसीबीने कारवाई सुरू केली. परंतु, या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर पालिका आयुक्त आणि लिपिक हे दोघेही फरार झाले आहेत. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लिपिक शेखर देशपांडेच्या बुऱ्हाण नगरमधील घरावर एसीबीकडून छापा देखील टाकण्यात आला आहे. तर आयुक्ताचे घर लाचलुचपत विभागाने सील केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर आयुक्त फरार झाले असून त्यांच्या कार्यालयाबाहेर एसीबीचे कर्मचारी तैनात आहेत. गुरुवारी २७ जून रोजी सकाळी सात वाजल्यापासून एसीबीने ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी लिपिक देशपांडे यांच्यामार्फत आठ लाखांची लाच मागितली होती. त्यानुसार गुरूवारी लाचेची रक्कम स्वीकरण्यात येणार होती. परंतु, एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त आणि लिपिक दोघेही फरार झाले आहेत. विशेष म्हणजे या दोघांनीही गुरुवारी शासकीय रजा टाकल्याची माहिती मिळत आहे.