पुणे : जमीन हडपण्यासाठी कोविड काळात कोरोनाची लागण झाल्याचे भासवित एका ज्येष्ठ नागरिकाला लोणी काळभोर येथील शिवम रुग्णालयात भरती करून त्यांचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये एक पोलीस कर्मचारी, हॉस्पिटल, मुलगा आणि नातू यांचा समावेश आहे. हा प्रकार २६ मे २०२१ ते २६ जून २०२४ या कालावधीमध्ये घडला आहे.
नारायण बापू तेलोरे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश विलास पोटे (वय ३७, रा. मांजरी ग्रीन अॅनेक्स, हडपसर), विलास नारायण तेलोरे (वय ५७), आकाश विकास तेलोरे (वय २८, दोघे रा. ब्राह्मणी, ता. राहुरी, अहिल्यादेवी नगर) आणि शिवम हॉस्पिटल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजेंद्र नारायण तेलोरे (वय ४५, रा. खळेवाडी, ब्राह्मणी, अहिल्यादेवी नगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश पोटे हा पोलीस कर्मचारी आहे, तर विलास आणि आकाश हे दोघे फिर्यादी यांचे चुलते व पुतणे आहेत.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कन्सल्टन्सीचा व्यवसाय असून त्यांनी पुण्याच्या प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी न्यायालय क्रमांक सातमध्ये फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला होता. फिर्यादी हे सध्या नाशिक येथे मुलीसोबत राहत आहेत. त्यांचे आई-वडील हे मूळ गावी राहत होते. त्यांचे वडील नारायण तेलोरे यांचे वय वाढले असल्यामुळे त्यांना विविध आजारांनी ग्रासलेले होते. फिर्यादी नाशिक येथे वास्तव्यास असल्यामुळे त्यांना सतत गावी यायला जमत नव्हते. त्यामुळे वडिलांची देखभाल तसेच वैद्यकीय देखरेखीसाठी सुनिता बाप भागवत-गुजर यांना केअरटेकर म्हणून कामाला ठेवले होते. त्याचबरोबर फिर्यादी हे त्यांच्या वडीलांना अधूनमधून नाशिक येथील अपोलो रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जात होते.
१० मे २०२१ रोजी नारायण तेलोरे यांना गुडघ्याचा व मणक्याच्या उपचारांसाठी नाशिकमधील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे डॉ. अनिल जाधव यांच्याकडे उपचार घेऊन आणि तपासणी करून त्यांना ब्राह्मणी येथील घरी पाठवण्यात आले होते. तसेच आईला दम्याचा व अर्धांगवायूचा त्रास होत असल्याने त्यांच्या दम्यावर डॉ. प्रवीण ताजणे व अर्धांगवायूवर डॉ. जितेंद्र शुक्ला उपचार करीत होते. त्यादिवशी नारायण तेलारे यांना सर्दी, खोकला किंवा कोरोनाची इतर कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. तसेच, त्यांना दवाखान्यात अथवा इतर ठिकाणी जायचे असेल, तर ते फिर्यादी यांना फोन करून तशी कल्पना देत असत. तसेच, केअरटेकर सुनिता हीस सांगून जात असे.
पोलीस कर्मचारी असलेला गणेश पोटे हा मांजरी येथे राहण्यास आहे. तर, विलास आणि आकाश हे फिर्यादींच्या आई-वडीलांना जमीनीसाठी त्रास देत होते. याच कारणांवरून फिर्यादीचे वडील नारायण आणि अन्य तींन आरोपी यांच्यामध्ये नेहमी भांडणे होत होती. १४ मे रोजी २०२१ रोजी गणेश पोटे याने फिर्यादी किंवा त्यांच्या केअर टेकरला काहीही न सांगता नारायण यांना गावावरुन थेट मांजरी येथे आणले. त्यानंतर २६ मे २०२१ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पोटे याने फिर्यादींना नारायण यांना पुण्यात आणले असून लोणी काळभोर येथील शिवम हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगितले. तसेच, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे कळविले. हे ऐकताच फिर्यादी यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर फिर्यादी तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. वडिलांचा मृतदेह पाहिला असता त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया केल्याचे टाके त्यांना दिसून आले. फिर्यादींना वडिलांच्या मृत्यूबाबत संशय आला. त्यांनी गणेश पोटेकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी पोटे याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोटे याने फिर्यादीला वडीलांचा मृत्य कसा झाला? कोणत्या कारणाने झाला? त्यांना काय त्रास होत होता? याबाबत डॉक्टरांकडून माहिती घेऊ दिली नाही.
तसेच त्याच्यासोबत असलेल्या दोन ते तीन व्यक्तींनी फिर्यादींना बाजूला नेले. त्यानंतर आरोपींनी घाईघाईने नारायण तेलारे यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी मांजरी येथील समशानभूमीमध्ये नेला. तिथे नातेवाईकांची वाट न बघता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. परंतु, फिर्यादी यांना वडीलांच्या मृत्यूबद्दल संशय वाटत असल्याने त्यांनी अंत्यविधी करण्याआधी शवविच्छेदन करण्याची विनंती केली. मात्र, त्यांचे काहीही म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही.
फिर्यादी पुन्हा शिवम हॉस्पिटलमधील डॉक्टरकडे वडीलांच्या मृत्यूबाबत चौकशी करण्यासाठी गेले. त्यावेळी देखील डॉक्टरांनी त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर डॉक्टरने गणेश पोटे याला बोलावून घेतले. पोटे याने फिर्यादीस धमकी दिली. तसेच फिर्यादी हे गावी असताना आरोपींनी ‘वडिलांच्या मृत्यूबद्धल जास्त वार्ता करू नको आणि आमच्या नादाला लागू नको. नाहीतर तुझ्या बापाच्या किडन्या जशा गायब केल्या, तशा तुझ्या पण गायब करून तुला खपवून टाकेल’, अशी धमकी दिली. त्यांना तलवारीने, काठीने व गजाने तसेच लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांना तक्रार अर्ज केला होता. मात्र, त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच, फिर्यादी शिवम हॉस्पिटलला देखील एक पत्र देऊन कागदपत्रे देण्याची विनंती केली होती. रुग्णालयाने त्यांना कागदपत्रे न देता टाळाटाळ केली. लोणी काळ्भोर पोलिसांनी देखील त्यांच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने या अर्जाची दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.