निलंगा : भाडेकरूंना जिण्यावरुन जाण्यासाठी का त्रास देता, असे म्हटल्याच्या कारणावरुन निर्माण झालेल्या वादातून आरोपींने संगनमत करून पती, पत्नीला मारहाण करून पत्नीचा नियमभंग केल्याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिला ही निलंगा शहरालगत असलेल्या आनंदनगर दापका येथील रहिवासी असून त्या ठिकाणी त्यांचे स्वतःचे तीन मजली घर आहे. घरची अडचण लक्षात घेऊन त्यांनी अर्धे घर म्हणजेच एक हजार स्केअर फूट जागा बांधकामासह सन २०१८- १९ मध्ये शिरुर-अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ येथील रहिवासी विमल गोपाळ पौळकर यांना विक्री केली. कालांतराने विमल पौळकर व त्यांचे पती गोपाळ पौळकर यांनी फिर्यादीच्या मालकीच्या तीन रुमवर कब्जा करुन हे पण घर आमचे आहे म्हणून दमदाटी करू लागले. किरकोळ कारणावरून ते दोघे सतत कुरापत काढून भांडण करत असे.
२० जून रोजी फिर्यादीने ठेवलेले भाडेकरू जिण्यावरुन वरती जात असताना विमल पौळकर त्यांना शिवीगाळ करू लागली. तेव्हा फिर्यादीने तुम्ही शिवीगाळ का करत आहात, जिण्यावर दोघांचाही अधिकार आहे, असे म्हणताच विमल पौळकर यांनी फोन करुन पती गोपाळ बब्रुवान पौळकर, ज्योतीराम पेठकर (रा. माळी गल्ली निलंगा), जगन्नाथ शिंदे (रा. किनीनवरे) यांना बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीला घराबाहेर अंगणात घेऊन गोपाळ पौळकर यांनी काठीने मारहाण करत हाताला धरून आणि साडीचा पदर ओढून विनयभंग करत जबर मारहाण केली. तर इतर तिघांनीही काठी लाथाबुक्क्यानी फिर्यादी व फिर्यादीच्या पतीला जबर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात आरोपी विमल गोपाळ पौळकर, गोपाळ बब्रुवान पौळकर, ज्योतीराम पेठकर, जगन्नाथ शिंदे यांच्यावर भादंवि कलम, ३२४,३५४,३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.