पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागातून शहरामध्ये विविध उद्योग व्यवसायांना परवाने आणि ‘ना हरकत’ प्रमाण देण्यात येतात. या परवाने आणि ‘ना हरकत’ प्रमाणपत्रावर एका महिला लिपिकाने विभाग प्रमुख असलेल्या उपायुक्त संदीप खोत यांची बनावट स्वाक्षरी करुन आर्थिक अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आकाशचिन्ह व परवाना विभागात शहरातील छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय परवाने दिले जातात. महापालिकेचे आकाशचिन्ह व परवाना उपायुक्त संदीप खोत यांची बनावट स्वाक्षरी करुन त्या लिपिक महिलेने कुदळवातील भंगार व्यावसायिकांना ना हरकत दाखले दिले होते. त्या ना हरकत प्रमाणपत्रावरुन व्यावसायिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
मात्र, प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे यापूर्वी पाठविलेले परवानगी प्रस्ताव आणि आता पाठविलेल्या प्रस्तावारील स्वाक्षरीमध्ये फरक दिसून आला. त्यामुळे संशय आल्याने उपायुक्त संदीप खोत यांना प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावेळी या प्रकरणी आपण चारही ना हरकत दाखल्यावरील स्वाक्षरी केली नसल्याचे संदीप खोत यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी चौकशी केल्यानंतर संबंधित लिपिक महिलेने बनावट स्वाक्षरी केल्याचे समजले. यावेळी त्या महिला लिपिकाने उपायुक्त संदीप खोत यांच्यासमोर आपणच स्वाक्षरी केली असल्याची कबुली दिली आहे.
उद्योग, व्यावसाय परवान्याचे कामकाज करणाऱ्या लिपिक महिलेने चार ना हरकत प्रमाणपत्रावर माझ्या खोट्या सह्या केल्या आहेत. या लिपिक महिलेने आपणच स्वाक्षरी केली असल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाला पत्र देवून संबंधित लिपिक महिलेवर या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी, असे कळवण्यात आले आहे. तसेच या महिला लिपिकेची तात्काळ बदली करण्यात आली आहे.
– संदीप खोत, उपायुक्त