मुंबई : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशन चांगलच गाजणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेत आपण राज्य सरकारच्या चाहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं सांगितलं. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.
“हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे. देशाच्या पंतप्रधानांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची वल्गना केली. खरंतर ही जुमलेबाजीच आहे. कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला दीडपट हमीभाव दिलेला नाही. 2013 मध्ये सोयाबीनला जे हमीभाव मिळत होते तेच 2024 ला मिळत असतील, तर शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीने केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्कारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांना हमीभाव देण्याबाबत सांगतील, अशी आशा होती. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला”, असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला.
“खरंतर हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर, बियाणांवर, ट्रॅक्टर आणि शेतीपयोगी अवजारांवर 18 टक्के जीएसटी लावतं, दुसरीकडे हेलिकॉप्टर खरेदी करत असताना 5 टक्के जीएसटी, डायमंड खरेदी करत असताना 3 टक्के जीएसटी, सोने खरेदी करत असताना 2 टक्के जीएसटी, म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारं सरकार आहे हे सिद्ध झालं आहे. जीएसटी कुठे लावावी हे या कमिशनखोर आणि टक्केवारी सरकारला याचं भानसुद्धा नाही. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
अत्यंविधीच्या प्रत्येक सामानावर सरकारने 18 टक्के जीएसटी लावली आहे. त्यामुळे आता या सरकारने मरण ही महाग केलंय का? हा प्रश्न उपस्थित होतोय. युरियाची पिशवी 50 रुपयाला मिळायची. ती आता 150 रुपयांवर केलीय. तसेच 50 किलोची युरियाची पिशवी आता 40 किलोची केलीय. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त व्हावं, आत्महत्या करावं, हा चंगच या सरकारने बांधला आहे”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
भाजपने दोन वर्षापूर्वी लोकशाहीचा गळा आवळला
“ज्या छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती आहे, ज्यांनी आयुष्यभर लोकशाहीचा पुरस्कार केला, त्याच कर्मभूमीत भाजपने दोन वर्षापूर्वी लोकशाहीचा गळा आवळला आणि बेकायदेशीरपणे सत्ता स्थापन केली हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. म्हणूनच जनतेने या निवडणुकीत एक सनसनीत उत्तर या गद्दारांना दिलं आणि हेही सांगितलं की, हुकूमशाही फार काळ टिकणार नाही आणि या देशात हुकशाह बनण्याचा प्रयत्न केला तर त्याची जागा दाखवल्याशिवाय संविधान राहणार नाही. कारण दडपशाहीने कुठलाही देश चालत नाही आणि दडपशाही करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे जनता कधीही उभी राहणार नाही हा संदेश सुद्धा आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने दिला आहे”, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.
राज्याला संपूर्ण खड्ड्यात घालण्याचं काम केलं आहे..
“आम्हाला चहापानाचं निमंत्रण मिळालं. पण महायुतीच्या सरकारने या राज्याला संपूर्ण खड्ड्यात घालण्याचं काम केलं आहे. अभद्र युती, याला अनैतिक संगत म्हणतो, अशी युती आपल्याला या राज्यात पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहे. या सरकारवर ज्यांची उरलेल्या छातीतील हवा काढण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने, मतदारांनी केलं आहे. त्यामुळे आम्ही मतदारांचे आभार मानतो. चौदाव्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. जनाधार गमावलेलं हे सरकार आहे. फार मोठ्या वल्गना केल्या की, 145 जागा जिंकण्याचा आणि तीनही पक्षांची अवस्था सर्व महाराष्ट्राने पाहिली”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.