यवत (पुणे) : येथील पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गा शेजारी असणाऱ्या भुलेश्वर स्टील या कंपनीच्या मालकी हक्काच्या जागेत महसूल विभागाची परवानगी न घेता कोट्यावधी रुपयांचे बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन केले असल्याची तक्रार श्रीजय शेंडगे यांनी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांच्याकडे केली आहे.
भुलेश्वर स्टील या कंपनीत हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन झाले आहे. कंपनीच्या मागील बाजूस असणाऱ्या डोंगराळ भागात मुरूम उत्खनन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर सुरुंग लावून स्फोट करण्यात आल्याचे शेंडगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करावी, असं देखील शेंडगे म्हटले आहे.
भुलेश्वर स्टील कंपनीच्या मालकावर मुरूम चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास दौंड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र शेंडगे यांनी दिले होते. परंतु, याबाबत महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने मंगळवार (दि.25) जून रोजी शेंडगे यांनी दौंड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला बसून 24 तास झाले, तरी देखील महसूल विभाग, तहसीलदार अरुण शेलार यांनी अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाही. बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या भुलेश्वर स्टील कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करत महसूल वसूल करावा. तसेच कंपनी मालकाला अभय देऊन कोणतीही कारवाई न करणाऱ्या तहसीलदाराचे निलंबन करावे, अशी मागणी उपोषणकर्ते श्रीजय शेंडगे यांनी केली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अक्षय बिचकुले, निलेश शेंडगे, अनिल चौधरी आदी उपस्थित होते.