मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रत्येकाला पंढरपूरची ओढ लागलेली असते. या ओढीसाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. येत्या 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या या पंढरपूरला जात असतात. पंढरीला जाणारी आषाढी वारी ही महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून चालत आलेली महत्त्वाची परंपरा राहिली आहे. या वारीत आता राहुल गांधीही सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काँग्रेस पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी हे पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी होण्याविषयी विचार करत आहेत. राज्यात येत्या तीन-चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास काँग्रेस पक्षासाठी ते फायदेशीर ठरु शकणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक 13 जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे काँग्रेस पक्षात आत्मविस्वास वाढला आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येणे, हे सोपे होणार आहे. तसेच यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साहदेखील कैकपटीने वाढू शकतो. त्यामुळे आता राहुल गांधी खरोखरच पंढरीच्या वारीत चालणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहे,
शरद पवार पायी वारीत होणार सहभागी
ढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत. बारामती ते इंदापूरच्या सणसरपर्यंतचे तब्बल 17 किलोमीटरचे अंतर शरद पवार पायी चालणार आहेत.