Raju Shetti : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव बाजूला सारून राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मैदानात उतरले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कैफियत यात्रेला सुरुवात झाली आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करुन या कैफियत यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. शाहू महाराजांचे जनकस्थळ कागल ते समाधिस्थळ कोल्हापूरपर्यंत ही कैफियत पदयात्रा असणार आहे.
काय म्हणाले राजू शेट्टी?
सरकारनं दिलेला शब्द पाळला नसल्याचे यावेळी राजू शेट्टी म्हणाले. मागील वर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी अधिक 100 रुपये मिळावेत, अशी आमची मागणी होती. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. ज्या कारखान्याने तीन हजार रुपये दिले त्यांनी जादा पन्नास रुपये शेतकऱ्यांना द्यायचे अशी मागणी ठरली होती. त्यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तो जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता. परंतु राज्य सरकारने याला परवानगी न दिल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत असे राजू शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टीं यांच्या मागण्या काय..
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे 100 व 50 रुपयाचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदारांना सद्बुध्दी मिळावी. तसेच शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, यासाठी शाहू महाराजांचे जनकस्थळ कागल ते समाधिस्थळ कोल्हापूर पर्यंत कैफियत पदयात्रेस सुरुवात झाली आहे.