नवी दिल्ली : लोकसभेत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शपथविधीवर आक्षेप घेण्यात आला. शपथविधी घेताना नागेश पाटील आष्टीकर यांनी वडिल आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केलं. त्यावर हंगामी लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत, दुरुस्ती सुचवली. शपथ घेताना जे लिहिलं आहे, त्यानुसारच शपथ घेणं आवश्यक असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं. त्यामुळे आष्टीकरांना पुन्हा एकदा शपथ घ्यावी लागली.
यावेळी शपथविधी घेताना नागेश बापूराव पाटील आष्टीकर म्हणाले, “मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने, दत्त महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व माझे वडील बापूराव पाटील आष्टीकर यांना स्मरुन शपथ घेतो की, मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेल.
यावेळी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तुहरी महताब यांनी आष्टीकर यांनी अशी शपथ घेत असताना, त्यांना थांबवलं आणि जे लिहिलं आहे तेच वाचायला सांगितलं. असं चालणार नाही, जे मराठीत लिहिलं आहे तेच वाचावं लागेल, तशीच शपथ घ्यावी लागेल, असं सांगितलं. त्यानंतर मग नागेश पाटील आष्टीकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. यावेळी त्यांनी अन्य नावांचा उल्लेख टाळत जशी लिहिली आहे तशीच शपथ घेतली आहे.