पुणे : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच धक्का बसला आहे. त्यानंतर आता महायुतीकडून विधानसभा निवडणुकीची चांगली रणनीती तयार केली जात आहे. लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये, यासाठी जागा वाटपावर चर्चा सुरु झाली आहे, उमेदवार चाचपणी सुरु आहे. त्याचवेळी विदर्भात भाजपला धक्का बसणार आहे.
रामटेक उमेदवारीबाबत भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यामुळे रामटेकचे माजी भाजप आमदार मल्लीकार्जुन रेड्डी शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यामुळे आता विदर्भात भारतीय जनता पक्षाला धक्का शिवसेनेकडूनच बसणार आहे.
मल्लीकार्जुन रेड्डी शिंदे गटात जाण्याची तयारी
विधानसभा निवडणुकीसाठी रामटेकचे माजी भाजप आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी तयारी सुरु केली असल्याचे चित्र आहे. भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांनी शिवसेना शिंदे गटाचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी ते शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून रामटेक विघानसभेसाठी पर्यायी उमेदवारांची चाचपणी केली जात असल्यामुळे रेड्डी यांनी एकनाथ शिंदे यांना संपर्क साधला असल्याचे समोर आले आहे.
माझी तयारी, आदेशाची प्रतिक्षा
रामटेकमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून आशिष नंदकिशोर जैस्वाल यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे द्वाराम मल्लिकार्जुन रेड्डी यांचा पराभव केला होता. जैस्वाल आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समर्थक आहेत. परंतु आता शिवसेना शिंदे गटाकडून इतर उमेदवारांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. माजी भाजप आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी सांगितले की, “मी गेल्या पाच वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत आहे. आमच्या नेत्यांनी आदेश दिल्यास मी निवडणूक लढणार आहे. रामटेक मतदारसंघात समाधानकारक विकास कामे झाली नाहीत, त्यामुळे विद्यामान आमदारावर लोकांचीही नाराजी आहे. ”