बार्शी: कदमवस्ती येथील दर्शना सोयाबीन मीलमध्ये कामाला असलेल्या चुलत्याला मील जवळील दोन शेतकरी मारहाण करत असल्याचे पुतण्याला कळताच भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पुतण्याच्या हातावर दोघांनी विळ्याने वार करून जखमी केल्याची फिर्याद तुषार श्रीधर भोसले याने तालुका पोलिसात दिली आहे. संदीप तुकाराम कदम व विनोद तुकाराम कदम (दोघे रा. कदमवस्ती, ता. बार्शी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हा २१ जून रोजी वेल्डींगसाठी लागणारे साहित्य घेऊन बार्शीवरुन शेलगांवकडे जात असताना वाटेत सायंकाळी ५.३० च्या सुमारास चुलते विष्णु रंगनात भोसले यांचा फिर्यादीस फोन करून दर्शना मील जवळ शेत असलेले शेतकरी संदीप कदम व विनोद कदम हे दोघे दारु पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करीत असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी पुतण्या पोहचला असता, ते दोघेजण चुलत्यास शिवीगाळ व मारहाण करीत होते.
भांडण सोडविण्यासाठी गेले असता संदीप याने फिर्यादीच्या हातावर विळा मारून जखमी केले, तर विनोद याने काठीने डोक्यात मारले. दरम्यान, भांडण पाहून मील मधील कामगार देखील जमा झाले आणि वाद सोडविला. त्यावेळी त्या दोघांनी तुम्ही येथे कसे दिसता तेच बघतो, दिसल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे