नवी दिल्ली : बहुचर्चित मद्यधोरण संबंधित प्रकरणी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीविरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना तिहार तुरुंगात सोडण्याच्या काही तास अगोदर त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांच्या याचिकेवर आज सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दिल्लीस्थित राऊज एवेन्यू विशेष न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना नुकताच जामीन मंजूर केला आहे. परंतु, त्यानंतर एका दिवसातच उच्च न्यायालयाने जामिनास स्थगिती दिली होती. यावेळी ईडीची बाजू मांडत अतिरिक्त महाधिवक्ते एस. व्ही. राजू म्हणाले की, केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय विकृत आहे. कारण तो हवाला प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४५ च्या तरतुदींच्या विपरित आहे. कनिष्ठ न्यायालयाने आमचे म्हणणे नीट ऐकले नाही. आम आदमी पक्षाने गुन्हेगारी मार्गाने कमावलेला पैसा गोवा विधानसभा निवडणुकीत वापरला. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. एवढेच नव्हे, तर आम आदमी पक्षाने ४५ कोटी रुपये लाच म्हणून स्वीकारल्याचे आम्ही सिद्ध केले; परंतु, विशेष न्यायालयाने आमचा युक्तिवाद फेटाळला व जामीन मंजूर केला, असे राजू यांनी उच्च न्यायालयात सांगितले. आम्हाला बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचेही ते म्हणाले. राजू यांच्या युक्तिवादावर सहमती दर्शवीत उच्च न्यायालयाने केजरीवालांचा जामीन २५ जूनपर्यंत स्थगित करण्याचा फैसला सुनावला होता. त्यामुळे त्यांचा तिहार तुरुंगातील मुक्काम काही दिवस वाढला आहे. आता उच्च न्यायालयाने जामिनाला दिलेल्या स्थगितीला अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.