विशाल कदम
उरुळी कांचन : सोरतापवाडी (ता. हवेली ) येथील शशिकांत मुरलीधर चौधरी यांची महाराष्ट्र राज्य नर्सरी मेन असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष विश्वास जोगदंड यांचा कार्यकाल संपल्यानंतर सदर पद रिक्त झाले होते. या पदासाठी असोसिएशनच्या वतीने पुण्यातील मुंढवा येथे सर्वसाधारण सभेचे आयोजन आज रविवारी (ता.६) करण्यात आले होते. या सभेत शशिकांत चौधरी यांची अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी असोसिएशनचे माजी अध्यक्ष संतोष शितोळे, बापूसाहेब सुरवसे, अनिल आंबेकर, सुनील चोरघे, सोरतापवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सनी चौधरी, तुषार चौधरी, गणेश शेंडगे, अमोल चौधरी, असोसिएशन पदाधिकारी व नर्सरी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पदाच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना नर्सरी व्यावसायिकांकडे पोहोचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच राज्यातील नर्सरी व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या त्वरित सोडविणार आहे. असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष शशिकांत चौधरी यांनी सांगितले आहे.